हेलिकॉप्टरमधून डागलेल्या क्षेपणास्त्राच्या हल्ल्याने ‘शत्रूचे’ युद्धनौकेचे विनाश! डीआरडीओचे नवीन यश

भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन – डीआरडीओ) स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित जहाजविनाशक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. बुधवारी भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरमधून डागण्यात आलेल्या NASM-SR या क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने लक्ष्य भेदले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
ओडिशाच्या चांदिपूर येथील क्षेपणास्त्र चाचणी केंद्रात (इंटिग्रेटेड टेस्ट रेंज – ITR) बंगालच्या उपसागरावर डीआरडीओ आणि भारतीय नौदलाने संयुक्तरित्या ही चाचणी पार पाडली. विशेष म्हणजे, सुमारे दीड वर्षांपूर्वी नौदलाच्या ‘सी किंग 42B’ हेलिकॉप्टरमधून प्रथमच NASM-SR क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. यावेळी लक्ष्यावर अधिक अचूक वार करण्यासाठी ‘टर्मिनल गाइडन्स’ तंत्रज्ञानासाठी स्वदेशी इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) ओळख प्रणाली वापरण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, २०१८ मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी NASM-SR क्षेपणास्त्र प्रकल्पाची सुरुवात केली होती.
भारताची शस्त्रास्त्रे आणि संरक्षण उपकरणांवरील परदेशी अवलंबन कमी करण्याच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमात हे क्षेपणास्त्र एक मोठे पाऊल आहे. सध्या भारताकडे रशियासोबतच्या संयुक्त प्रयत्नांतून विकसित केलेले ‘ब्रह्मोस’ हे ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे (सुपरसॉनिक) क्रूझ क्षेपणास्त्र आहे. हे पृथ्वीवरील सर्वात वेगवान क्षेपणास्त्रांपैकी एक आहे (2.8 मॅक म्हणजे ध्वनीच्या वेगाच्या 2.8 पट वेगवान). युद्धनौकांव्यतिरिक्त, सुखोई-30 सारख्या लढाऊ विमानांतूनही डागता येणारे ब्रह्मोस हे ४५० किमीच्या कार्यक्षेत्रासह जहाजविनाशक क्षेपणास्त्र आहे.