पाकिस्तानविरुद्ध शतक झळकताच आयसीसी क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये विराट, अव्वल स्थानी शुभमन

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावत सामना जिंकवून दिल्यानंतर विराट कोहली आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवला आहे. अव्वल स्थानी शुभमन गिल असून, बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील फलंदाजांच्या क्रमवारीत शुभमन गिल आधीपासूनच पहिल्या स्थानावर होता आणि त्याने आपले स्थान कायम राखले आहे.
शुभमनकडे ८१७ गुण आहेत आणि तो बाबर आझमपेक्षा ४७ गुणांनी पुढे आहे. तिसऱ्या स्थानी रोहित शर्मा, चौथ्या स्थानी हेनरिक क्लासेन आहेत. या चौघांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. मात्र, पाचव्या स्थानावर विराट कोहली पोहोचला आहे. तो पूर्वी सहाव्या क्रमांकावर होता. पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकल्यानंतर त्याने एक स्थान वर झेप घेतली असून, डॅरिल मिचेल एक स्थान खाली गेला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील गोलंदाजांच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये भारताकडून केवळ कुलदीप यादव आहे. तो तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी केशव महाराज पोहोचला आहे. अव्वल स्थानी माहिश थीक्षाना कायम आहे. मात्र, शाहीन आफ्रिदी पाच स्थानांनी खाली घसरला आहे. पाकिस्तानचा हा वेगवान गोलंदाज यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विशेष प्रभाव पाडू शकलेला नाही. तो आता नवव्या स्थानी आहे.
एकदिवसीय क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या दहामध्ये कोणताही बदल झालेला नाही. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी अव्वल स्थानी असून, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानचा अजमतुल्ला ओमरझाई तिसऱ्या स्थानी आहे. पहिल्या दहामध्ये भारताकडून केवळ रवींद्र जडेजा आहे, जो नवव्या स्थानी आहे.