थोडं सावध राहा, कानात इयरफोन लावून गाणं ऐकण्याची सवय धोकादायक : सर्वेक्षण

तरुण पिढीतील बहुतांश लोकांना कानात इयरफोन लावून गाणी ऐकण्याची सवय असते. मात्र, या सवयीमुळे श्रवणशक्तीवर परिणाम होण्यासोबतच, इयरफोन कानात असताना अपघात होऊन जीव गमावण्याच्या घटना देखील नवीन नाहीत. पण जर थोडं सावध राहिलं, तर या समस्यांपासून दूर राहणं शक्य आहे.
स्वस्त इयरफोन टाळा, योग्य ब्रँडचाच इयरफोन वापरा
स्वस्त आणि स्थानिक ब्रँडचे इयरफोन वापरणे टाळा. ज्या कंपनीचा मोबाईल तुम्ही वापरत आहात, त्याच कंपनीचा इयरफोन वापरण्याचा सल्ला दिला जातो.
प्रत्येक कंपनी त्यांच्या विशिष्ट फोनसाठी ठरावीक इयरफोन तयार करते. मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या लहरी आणि कंपन यावर आधारित इयरफोनची कार्यक्षमता ठरवली जाते. अनेकजण इयरफोन खराब झाला की, बाजारातून स्वस्त इयरफोन विकत घेतात, पण असे इयरफोन योग्य प्रमाणात लहरी आणि कंपन नियंत्रित करू शकत नाहीत, त्यामुळे ते कानासाठी अतिशय हानिकारक ठरतात.
श्रवणशक्ती वाचवायची असेल तर आवाजाची पातळी नियंत्रित ठेवा
इयरफोनवर मोठ्या आवाजात गाणी ऐकू नका. जास्त आवाजात संगीत ऐकल्याने कानाच्या पडद्याला मोठे नुकसान होऊ शकते. अनेक मोबाईलमध्ये मोठा आवाज वाढवताना, याबाबत सतर्कतेचा इशारा दिला जातो. त्यामुळे ठरावीक मर्यादेपेक्षा अधिक आवाजात गाणी ऐकणे टाळा.
कमी आवाजात गाणी ऐकण्याचा फायदा
कमी आवाजात गाणी ऐकल्यास आजूबाजूचा आवाज देखील ऐकू येतो. विशेषतः रस्त्यावर चालताना किंवा वाहन चालवताना इयरफोनचा आवाज कमी ठेवावा. रेल्वे पटरीवरून जात असताना, कानात इयरफोन लावून चालण्याने मोठा धोका उद्भवू शकतो. थोड्या निष्काळजीपणामुळे जीव गमवण्याची वेळ येऊ शकते.